चला हस्तकला समजून घेऊया - भाग १
तुम्हाला हस्तकलेची आवड आहे का ?
तुम्ही सतत काही ना काही क्रिएटिव्ह क्राफ्ट करत असता का ?
हस्तकलेबद्दल तुम्हाला नितांत प्रेम आहे का ?
या सर्व प्रश्नांचे उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.
नमस्कार, मी शोभा थोरवत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि The Craft Shala' या प्लॅटफॉर्मची निर्माती. हस्तकलांना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आणि मुलांना त्यांच्या या छंदाचे रूपांतर त्यांच्या व्यवसायात करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा माझा ध्यास आहे.
प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. छंद जोपासल्याने सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळतं. छंद, कला या गोष्टी माणसाला सन्मार्ग, सद्विचार आणि सद्बुद्धी देतात. आपल्या येथील जास्त परिचयाची कला म्हणजे हस्तकला. हस्तकला ही जगातील प्रसिद्ध कला आहे. हस्तकलेबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
हस्तकला हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाही. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे तर हस्तकला म्हणजे हाताने काम करून सुंदर वस्तू तयार करण्याची कला होय. हस्तकला हा कलेचा पारंपारिक भाग आहे.
हस्तकला ही एक क्रियाशील कला असून यात अनेक साहित्यांचा वापर करून नानाविध वस्तू बनवल्या जातात. यात प्रामुख्याने पेपर, कापड, लाकूड, वायर, मणी यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. कापणे, विणणे, चिकटवणे, ओवणे, रंगवणे, कोरणे, जोडणे अशा क्रिया हस्तकलेमध्ये केल्या जातात. यात कोणत्याही स्वयंचलित मशीनचा वापर केला जात नाही. उलट कात्री, हुक, कोरीव कामासाठी लागणारे साचे वापरले जातात.
हस्तकलेच्या माध्यमातून घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तू, सजावटीच्या वस्तू, दागिने, पिशव्या, फॅशन संबंधित गोष्टी, कपडे, चपला, गीफ्ट्स यांसारख्या असंख्य गोष्टी तयार केल्या जातात. संपूर्ण जगात आपला भारत देश हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. हाताने बनवलेल्या सुंदर सुंदर व टिकाऊ वस्तूंची मागणी जगभरात मोठ्या प्रमाणात आहे.
हस्तकला हा व्यवसायाचा उत्तम पर्याय म्हणून पाहिला जातो. काळानुरूप हस्तकलांमध्येही बदल होत आहेत. हस्तकला हे क्षेत्र व्यापक बनत चाललं आहे. यात करियरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत आहेतच त्याशिवाय आपल्या देशातील विविध हस्तकला जगापर्यंत पोहोचत आहेत. तसेच टाकाऊ वस्तूंचा वापर करून हाताने बनवलेल्या कलात्मक वस्तू काळाची गरज बनत आहेत.
भारतातील सर्वात जुनी हस्तकला म्हणजे ढोकरा. ही ४००० वर्षांपासूनची कला आहे आणि आजही ती अस्तित्वात आहे. यात वेगवेगळ्या धातूंचा वापर करून मूर्ती, भांडी व रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू बनवल्या जातात.
ग्रामीण हस्तकला या भौतिक वस्तूंच्या आवश्यकतेतुन निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे प्राचीन संस्कृतीच्या या ग्रामीण हस्तकलांमध्येच हस्तकलेची मुळे आहेत.शतकानुशतके बऱ्याच हस्तकलांचा अभ्यास केला जात आहे. त्यातून अनेक आधुनिक शोध लागत आहेत. काही हस्तकला पूर्वी त्या त्या ठराविक भौगोलिक क्षेत्रापुरत्या मर्यादित होत्या. त्या आता इतर लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि सर्जनशील विकासासाठी हस्तकला हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये मुलांना प्रामुख्याने हस्तकला शिकवल्या जातात. हस्तकलेचे अनेक फायदे आहेत. आपल्या सर्वांगीण विकासासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी हस्तकला मदत करते.
Handmade वस्तूंची वाढती मागणी आणि त्याचे फायदे पाहता भविष्यात हस्तकला नवनवीन रूपात जगासमोर येणार आहेत आणि यात करिअर घडवणं सोयीस्कर होणार आहे.
आपण या ब्लॉग मध्ये पाहिलं की, हस्तकला म्हणजे काय,त्यासाठी काय काय वापरलं जातं, हस्तकला आजच्या जगात किती महत्वाची आहे आणि भविष्यातील हस्तकलेची मागणी कशी असेल.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ? तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट्स द्वारे नक्की कळवा... तसेच तुम्हाला तुमच्या मुलांना हस्तकला शिकवायच्या असतील व हस्तकलेसंबंधी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर "The Craft Shala" एक फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईंन करा. माझा ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे.

'विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि सर्जनशील विकासासाठी हस्तकला हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये मुलांना प्रामुख्याने हस्तकला शिकवल्या जातात'. अगदी बरोबर. घरी सुद्धा पालकांनी मुलांना हस्तकलेच्या वस्तु दाखवणे आणि जमलेच तर करायला मदत करणे आवश्यक आहे
उत्तर द्याहटवाहस्तकला खुप महत्वाची आहे कारण finger tips ,बोटांनी , हातांनी जेवढं अधिक काम आपण करू किंवा लहान मुलांकडून करून घेऊ, तेवढी आपली बोद्धिक क्षमता चौफेर विकसीत होते. खुप छान लिहीलाय ब्लॉग. Thank you
उत्तर द्याहटवाखूप आवडला
उत्तर द्याहटवाखूप आवडला
उत्तर द्याहटवा