चला हस्तकला समजून घेऊया - भाग ३
आपला भारत देश अनेक कलांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच आपल्या देशात सर्वच बाबतीत विविधता दिसून येते. त्याचप्रमाणे हस्तकलांमध्येही अनेक विविधता आहेत आणि भारत देश हस्तकलेचं सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून ओळखला जातो.
नमस्कार, मी शोभा थोरवत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि 'The Craft Shala' या प्लॅटफॉर्मची निर्माती. हस्तकालांना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आणि मुलांना त्यांच्या या छंदाचे रूपांतर त्यांच्या व्यवसायात करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा माझा ध्यास आहे.
भारतीय हस्तकला व हस्तव्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. हस्तकलेतून निर्माण झालेल्या वस्तूंत विविधता, उपयुक्तता व कलात्मकता या गोष्टी दिसून येतात. माती, लाकूड, चामडे, काच, कापड, बांबू, हस्तिदंत, रेशीम, शिल्प अशा वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय हस्तकला विकसित झाल्या आहेत आणि त्यांची जगभर मागणी सुद्धा आहे. अगदी प्राचीन काळापासून हस्तकला अस्तित्वात असल्या तरीही मुघल काळात खऱ्या अर्थाने भारतीय हस्तकलेची भरभराट झाली. परंतु नंतर मुघल सत्तेचा अंत झाला आणि ब्रिटिशांच्या आगमनाने हस्तकला लयाला जाऊ लागल्या. कारण ब्रिटिशांच्या काळात यंत्राच्या साहाय्याने बनवलेल्या वस्तू स्वस्त व घाऊक दरात मिळू लागल्या. त्यामुळे हस्तकला निर्मित वस्तूंना यंत्रनिर्मित वस्तूंचा मुकाबला करणं अवघड जाऊ लागलं. तुम्हाला भारतीय हस्तकलेचा समृध्द इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
भारतात दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सामान्य वस्तू सुद्धा कलात्मक पद्धतीने हस्तकलेच्या माध्यमातून तयार केल्या जातात. कारागिराची कल्पकता व कौशल्य यांचा मेळ साधत हस्तकला पिढ्यानपिढ्या टिकून आहेत. प्रादेशिक विविधता हे भारतीय हस्तकलेचे वैशिष्ट आहे. हस्तकलेसाठी वापरली जाणारी हत्यारे, रंग व इतर सामान हे त्या-त्या प्रदेशातील उपलब्धता यावर अवलंबून आहे. प्रत्येक प्रदेशात मिळणारी व उपलब्ध असलेली सामग्री वापरून लोकांच्या गरजांचे भान ठेवून या हस्तकला प्राचीन काळापासुन निर्माण झालेल्या आहेत. भारतात प्रत्येक भागाची विशिष्ट हस्तकला आहे. जसे ती -
१) मातीकाम / कुंभारकाम -
अगदी प्राचीन काळापासून भारतात मातीची भांडी व मूर्ती वापरल्या जातात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात काळया व लाल रंगाची मातीची भांडी सापडली आहेत. काश्मीर, आजमगड, कांगडा, कच्छ, पोखरण, अलवर येथे बनवलेली मातीची भांडी जगप्रसिद्ध आहेत. चुनार येथील सूरया देखील खूप प्रसिद्ध आहेत. राजस्थानातील जयपूर तसेच दिल्ली येथे बनवत असलेल्या ब्लू पॉटरी (नील मृत्तिकापात्रे ) यांचे विशेष स्थान आहे.
भारत मातीच्या मुर्त्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगाल येथील बांकुरा येथे घोड्याच्या मूर्ती बनवल्या जातात. त्या 'बांकुरा अश्व' या नावाने प्रसिद्ध आहेत. तसेच राजस्थान व महाराष्ट्रामधील गणेश मूर्ती, तामिळनाडू येथील अनार मूर्ती, बिहारमध्ये बनवणाऱ्या मूर्ती यांना जगभरात मागणी आहे.
२) जडजवाहीर व अलंकार -
भारतात अलंकारांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे भारत देश दागदागिने यांसाठी प्रसिद्ध आहे.
गुजरातमधील मौल्यवान खडे आणि हिरे यांचे दागिने तर ओडीसा व केरळ येथील सोन्याचे दागिने अत्यंत प्रसिद्ध आहेत. कर्नाटक मधील बिद्री हे गाव चांदीच्या दागिन्यांसाठी तर काश्मीर बांगड्या, अंगठ्या, गळसऱ्या यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. राजस्थानच्या लाखेच्या बांगड्यांना विशेष मागणी आहे.
३) लाकुडकाम -
लाकूड काम हा प्राचीन हस्त व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. लाकडावर कोरीव काम करून पशुपक्षी, माणसांच्या प्रतिकृती, फर्निचर तसेच अनेक शोभेच्या वस्तू बनवल्या जातात आणि त्यांची जगभर मागणी आहे.
सावंतवाडी येथील लाकडी खेळणी, काश्मीरमध्ये घरात वापरायची लाकडी भांडी तर कर्नाटक लाकडी पेटी यांसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपुरच्या खोलगट नक्षीचं कोरीव काम केलेल्या आरशाच्या चौकटी, अक्रोडाच्या मऊ लाकडावरील जाळीदार कोरीव काम केलेले काश्मिरी दिपाधार, गोलाकार तबके, लतावेलींचे कोरीवकाम केलेली मध्यप्रदेशमधील टेबले, कपाटे, महाराष्ट्रातील दिवाण वैशिष्ट्यपूर्ण असतात. नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम येथील आदिवासी लोकांचे लाकूडकाम देखील अतिशय आकर्षक असते. राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व पश्चिम बंगाल येथील चंदनीकाम जगात प्रसिद्ध आहे.
४) बुरुडकाम -
इ.स. पु. ५००० वर्षांपासून बुरुड काम ही कला चालू आहे. यामध्ये बांबू, गवत, माडाची व खजुराच्या झाडांची पाने, ताडपत्र यांपासून चटया, टोपल्या, पेट्या, धान्य भरण्याच्या कणग्या, कोळ्यांच्या टोपल्या, झोपाळे, छत्र्या तसेच इतर वस्तू बनवल्या जातात.
तामिळनाडू, म्हैसूर, बंगाल येथे बनवल्या जाणाऱ्या चटया खूप प्रसिद्ध आहेत. तसेच राजस्थान, काश्मीर, बिहार येथे ताडपत्र व विशिष्ट प्रकारच्या गवतापासून बनवलेल्या टोपल्या बनवला जातात. तामिळनाडू, मणिपूर, केरळ, पश्चिम बंगाल जगप्रसिद्ध चटयांसाठी ओळखले जातात.
५) धातुकाम -
इ.स. पु. ३००० वर्षांपासून भारतीय धातुकाम ही कला अस्तित्वात आहे. धातूकामात धातू वितळवून त्यापासून रोजच्या वापरातील भांडी, तबके, हुक्के, घंटा, रक्षापात्रे, चिमटे, पकडी, चहादाणी अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.
विविध आकार, पानाफुलांची नक्षी, निसर्गदृश्य असलेल्या पितळी भांड्यांसाठी जयपूर, वाराणसी, मुरादाबाद ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तसेच पश्चिम बंगाल, बिहार, केरळ, ओडिशा ही ठिकाणं मिश्रधातूंच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहेत.
६) शिल्पकला -
आपला भारत देश दगडावरील कोरीव कामासाठी देखील प्रसिद्ध आहे. देशातील लेण्या आणि मंदिरे ही शिल्पकलेची उत्तम उदाहरणे आहेत. संगमरवरी दगडावरील कोरीव काम हे सर्वात प्रसिद्ध आहे. जयपूर, आग्रा या ठिकाणी संगमरवराच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.
ओडिसा येथील शिल्पकला धार्मिक परंपरांशी जोडलेल्या असल्याचं दिसून येतं. त्याच बरोबर महाबलीपुरम, राजस्थान, कर्नाटक ही राज्य कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत.
७) हस्तिदंत -
हस्तिदंतावरील काम हे अतिशय क्लिष्ट असते. हस्तिदंतांपासून बनवलेल्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे.
दिल्लीमध्ये हस्तीदंतांचे दागिने, राजस्थानमधील बांगड्या पश्चिम बंगालमध्ये तयार होणाऱ्या दुर्गा देवीच्या मूर्ती, केरळमध्ये तयार होणाऱ्या देवतांच्या मूर्ती, वाराणसीतील बुद्ध मूर्ती प्रसिद्ध आहेत. पंजाब, दिल्ली, बंगाल, मैसूर ही ठिकाणं हस्तिदंताच्या वस्तूंसाठी ओळखली जातात.
८) वस्त्रकला -
रेशमी धाग्याची कलाकुसर, भरतकाम, सुंदर नक्षीदार रंगकाम ही भारताच्या वस्त्रकलेची वैशिष्ट्य आहेत. महाराष्ट्राची पैठणी, ओरिसाची इक्कत, राजस्थान व गुजरात मधील पाटोळा, उत्तर प्रदेशची जामदानी, बंगालची बालूचार, तामिळनाडूची कांजीवरम, वाराणसीची किनखाब हे साड्यांचे उत्कृष्ट प्रकार आहेत. काश्मीरी शाल तर जगप्रसिद्ध आहेत.
भारतीय भरतकामाला जगात एक वेगळं स्थान आहे. भारतीय भरतकामात निसर्गाचा मोठा परिणाम पाहायला मिळतो. प्रत्येक भागात आढळणाऱ्या वृक्षवल्ली, पशुपक्षी, नैसर्गिक रंग यांचे प्रतिबिंब भरतकामात दिसून येतं. भरतकामाचे नानाविध प्रकार भारतात पाहायला मिळतात. पैठण, बँगलोर, मद्रास, भोपाळ ही ठिकाणं जरीकामासाठी प्रसिद्ध आहेत.
९) काचकाम -
मध्ययुगात काच कामाला विशेष प्रोत्साहन देण्यात आले. काचांचा व आरशांचा वापर इमारतीतील आतील भाग सजवण्यासाठी करण्यात येऊ लागला.
काचेपासून झुंबर, हंड्या, अत्तराच्या कुप्या यांची निर्मिती करण्यात येते. सध्या हैदराबाद, फिरोजाबाद, सहारनपुर, वाराणसी ही ठिकाणं काचकामासाठी प्रसिद्ध आहेत.
१०) चर्मकला (लेदर आर्ट)-
चर्मकला ही राजस्थान मधील प्रसिद्ध हस्तकला आहे. बिकानेर येथे चामड्यापासुन ज्या वस्तू बनवल्या जातात त्याला 'मनोती कला' म्हटलं जातं आणि ती अतिशय प्रसिद्ध आहे.
चर्मकला इ. स. पु. ३००० च्या काळात विकसित झाली. चामड्यापासून जॅकेट, टोप्या, पाकीट इत्यादी वस्तू बनवल्या जातात. काश्मीर मध्ये सजावटीच्या वस्तू, राजस्थानमध्ये मोजड्या, कोल्हापूर येथील कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहेत. कानपूर, चेन्नई, कोल्हापूर या ठिकाणी चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
आपण या ब्लॉगमध्ये पाहिलं की भारतातील हस्तकला या प्रत्येक प्रदेशाची संस्कृती व परंपरा यांवर आधारित आहेत. भारताच्या हस्तकलांचे जतन, संवर्धन व विकास करणे गरजेचे आहे. भारताला हस्तकलेचा समृद्ध इतिहास लाभलेला आहे.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ? तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांना हस्तकला शिकवायच्या असतील व हस्तकलेसंबंधी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर 'The Craft Shala' ही कम्युनिटी जॉईंट करा. माझा ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे.
खुप छान, माहितीपूर्ण
उत्तर द्याहटवाJabardast. Very nice information🙏
उत्तर द्याहटवाछान माहिती मिळाली
उत्तर द्याहटवा