चला हस्तकला समजून घेऊया - भाग ४

बहु असोत सुंदर संपन्न की महा |

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ||

        आपल्या महाराष्ट्र राज्याला समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. आपल्या या महाराष्ट्र राज्यात अनेक रत्नांनी जन्म घेतला आणि आपल्या गुण, शौर्य, ज्ञान, कर्तबगारी व सकारात्मक विचारांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली. आपला महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, किल्ल्यांनी, निसर्ग सौंदर्या, प्राचीन लेणी या सर्वांनी नटलेला आहे. महाराष्ट्र प्रथा-परंपरा, निसर्ग सौंदर्य, खाद्यपदार्थ, संस्कृती या सर्व बाबतीत संपन्न आहे. त्याचप्रमाणे हस्तकलांच्या बाबतीतही महाराष्ट्राने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तुम्हाला महाराष्ट्रावर नितांत प्रेम आहे का..?
तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध हस्तकला जाणून घ्यायच्या आहेत का..?
या प्रश्नांची उत्तरं 'हो ' असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे.

        नमस्कार, मी शोभा थोरवत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि The Craft Shala या प्लॅटफॉर्मची निर्माती. हस्तकलाना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आणि मुलांना त्यांच्या या छंदाचे रूपांतर त्यांच्या व्यवसायात करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा माझा ध्यास आहे.

         भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची एक परंपरा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रही संपन्न अशा परंपरेने नटलेला आहे. महाराष्ट्र हा महा व राष्ट्र या दोन शब्दांनी बनलेला आहे. म्हणजेच महान राष्ट्र. अगदी नावाला शोभेल असाच महान इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या हस्तकलेचा समृद्ध इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

        महाराष्ट्रातील हस्तकला विविधता आणि निवड यांच्या बाबतीत श्रीमंत आहे. महाराष्ट्र हस्तकला उद्योग हे दैनंदिन गरजांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण उत्पादन निर्माण करतात. महाराष्ट्रातील हस्तकला मराठा, मुघल व अगदी ब्रिटिशांच्या काळात फार पूर्वीपासून निर्माण झाल्या. या हस्तकला महाराष्ट्रीयन संस्कृतीचे भाव दर्शन घडवून आणतात. येथील हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे चित्रण करतात आणि त्याच बरोबर विविध परंपरांचे अनोखे मिश्रण दाखवतात. महाराष्ट्र राज्य आपल्या हस्तकलांमधून एक जिवंत भाव प्रदर्शित करतं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हस्तकला पुढील प्रमाणे आहेत -
१) सावंतवाडीची लाकडी खेळणी-
        सावंतवाडी हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटस गाव आहे. जे हातांनी बनवलेल्या लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.

ही हस्तकला सतराव्या शतकापासून येथे प्रचलित आहे.येथील हस्तकला कारागीर हे बहुतांशी गोवा व कोकणातील आहेत. या हस्तकलांमध्ये मुख्यत्वे हाताने रंगवलेले पारंपारिक फर्निचर समाविष्ट आहे. आंब्याच्या झाडाचे लाकूड वापरून ही खेळणी बनवली जातात. लाखेचा वापर करून यांना पॉलिश केलं जातं त्यामुळे ती सुंदर व चमकदार दिसतात. सावंतवाडीची लाकडी खेळणी जगभर प्रसिद्ध आहेत.

२) मशरू व हिमरु-
       मशरू व हिमरू हे रेशीम व कापसापासून बनवलेले फॅब्रिक आहे जे औरंगाबाद मध्ये प्रसिद्ध आहे. हिमरुला कुम खुआब असेही म्हटले जाते. पूर्वीच्या काळी प्रतिष्ठित मंडळी या कापडांचे ड्रेस वापरत असत. मशरू शॉल विविध रंगांच्या डिझाइन्स मध्ये मिळतात तसेच त्यांची किंमतही जास्त असते. 
मोहम्मद बिन तुघलक यांनी बनारस आणि अहमदाबाद या ठिकाणाहून हिमरू कारागीर आणले आणि औरंगाबाद मध्ये हिमरू उद्योगाचा पाया घातला गेला.

३) बिद्रिकाम -
        बिदर हे महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असलेलं गाव. याच गावात या हस्तकलेला सुरुवात झाली म्हणून त्याचं नाव पडलं बिद्रीकाम.
बिद्रीकाम हे तांबे आणि जास्त तसेच शुद्ध चांदी वापरून केले जाते. चांदीच्या तारा वापरून केलेले काम म्हणजेच तारकशी आणि चांदीचे लहान तुकडे वापरून केलेले काम म्हणजे तेहनिशान. असे बिद्री कामाचे दोन प्रकार पडतात. बिद्रीकामासाठी वापरला जाणारा विशिष्ट धातू हा बिदर मधेच बनवला जातो. या धातूला गंज चढत नाही हे याचे वैशिष्ट्य आहे. सुफी ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती  यांनी सर्वप्रथम भारतात बिद्रीकाम केलेली भांडी आणली. हातोडा व छिन्नी वापरून ही कलाकुसर केली जाते. बिद्रीकाम हे हस्तकलेचा अप्रतिम नमुना आहे.

४) नारायण पेठ साडी -
         सोलापूर जिल्ह्यात तयार होणारी नारायण पेठ साडी अतिशय लोकप्रिय आहे. ही परंपरागत साड्यांपैकी एक असून प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यात विणली जाते. एका लुमवर एकाच वेळी आठ साड्या बनवल्या जातात. हे या साड्या विणण्याच्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. या साड्या बनवताना जे धागे वापरले जातात त्या धाग्यांना रंग देऊन ते पाण्यात उकळले जातात. येथील पाण्याच्या विशिष्ट गुणधर्मामुळे या साडीच्या रंगांना विशिष्ट चकाकी येते. व्हेजिटेबल रंग, साडीभर बारीक चौकडा, जरीचे काठ, त्यावर करवतीचे डिझाईन ही नारायण पेठ साडीची वैशिष्ट्ये आहेत. 
या साड्यांचे पदर मुख्यत्वे जांभळे, गुलाबी किंवा मरून रंगाचे असतात. अतिशय सुंदर दिसणारी ही नारायण पेठ साडी आपल्याकडे असावी ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

५) कोल्हापुरी चप्पल -
       कोल्हापूरचं प्रमुख आकर्षण म्हणजे कोल्हापुरी चप्पल. सुबक आकार, नक्षीकाम व टिकाऊपणा ही या चपलांची ठळक वैशिष्ट्ये. भारतातच नाही तर भारताबाहेर देखील कोल्हापुरी चपलांना विशेष मागणी आहे.कोल्हापुरी चप्पल १३ व्या शतकात उदयास आली. पूर्वी ती काप्दासी पायताण म्हणून ओळखली जात असे.

        या चपलांचा पृष्ठभाग चामड्याचा असतो तर तळ मात्र लाकडाचा असतो. या तळावर रबराचे आच्छादन देखील असते. या चपलांच्या टाचा उंच नसतात तर सपाट असतात. या चपलांना मध्यभागी एक पट्टी व एक अंगठा असतो. या चपला पूर्णपणे चामड्याच्या असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा थंडपणा जाणवतो व चालताना त्रास होत नाही. कोल्हापुरी चपला पूर्णपणे हाताने बनवलेल्या असतात आणि मुख्य हणजे या चपला बनवण्याचे काम 90 ते 95 % महिला कामगार करतात.

६) पैठणी साडी -
        औरंगाबादमधील पैठण ही पूर्वीच्या काळी महाराष्ट्राची राजधानी होती आणि या पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्टपूर्ण साडी म्हणजे पैठणी. पदरावरच्या मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखता येते. भारतातील पारंपारिक व महागड्या साड्यापैकी एक म्हणून पैठणीकडे पाहिले जाते. उत्कृष्ट रेशमापासून बनवलेली ही साडी आजही महाराष्ट्राची शान आहे.
पैठणी साडी हा प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पूर्वी पैठणी साड्यांचे जास्त डिझाईन्स नव्हते पण आता पैठणी साड्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स समोर यायला लागले आहेत. पैठणी पूर्णतः ताग्यावर विणली जाते. तसेच पैठणीच्या पदरावरील जरी कामात खऱ्या सोन्याचे व चांदीचे धागे वापरून विणकाम केले जाते. पैठणी कधीही काळी पडत नाही.

७) कोल्हापुरी साज -
        साज हा नेकलेसचा एक प्रकार असून महाराष्ट्रीय स्त्रियांमध्ये हा अतिशय प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी साज बनवला जातो पण यांमध्ये कोल्हापुरी साज हा फार प्रसिद्ध आहे. 
हा दागिना लाखे पासून बनवलेला असतो. यात मासा, कमळ, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव, भुंगा असे शुभ आकार आणि एक सोडून एक म्हणी ओवलेले असतात. मध्यभागी एक लॉकेट असते त्याला पानडी असे म्हणतात.

८) वारली पेंटिंग-
        वारली ही एक आदिवासी जमात असून महाराष्ट्रातील कोकण विभागात तिचं वास्तव्य आहे. डहाणू व पालघर या जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या या वारली जमातीची चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत. 
या चित्रशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गेरूने भिंती सारवून त्यावर तांदळाच्या पांढर्‍या पीठाने साधे व सुबक आकार रंगवले जातात. गोल, त्रिकोण, आयत अश्या भौमितिक आकृतीचा वापर वारली चित्रकलेत केलेला दिसतो. जिव्या सोमा म्हशे या वारली चित्रकाराने वारली चित्रकला जगभरात पोहोचवली. कपडे, पिशव्या, भिंती, फुलदाणी, घरे अशा विविध ठिकाणी वारली चित्रकला जगभरात काढली जाते.

      या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्रतील ८ समृद्ध हस्तकला पाहिल्या. या हस्तकलांना  जगभर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या हस्तकलांबरोबरच अजून बऱ्याच हस्तकला आहेत ज्या महाराष्ट्राला संपन्न करतात.

          तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ? तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि कसा वाटला हे कंमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांना हस्तकला शिकवायच्या असतील व हस्तकलेसंबंधी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर 'The Craft Shala' ही कम्युनिटी जॉईंट करा. माझा ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे.

टिप्पण्या

  1. खुप छान माहिती, ह्यातली प्रत्येक वस्तू माझ्या आवडीची आहे, बिद्री कामाबद्दल विषेश माहिती मिळाली, माझ्याकडे बिद्री काम केलेली लहानशी सुरई आहे. ब्लॉग खुप आवडला. Thank you

    उत्तर द्याहटवा
  2. माहितीपूर्ण आणि उत्सुकता निर्माण करणार लिखाण

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चला हस्तकला समजून घेऊया - भाग १