कलेच्या माध्यमातून मुलांचे ज्ञान वाढेल, कला आणि हस्तकलेमुळे होणारे हे 6 फायदे जाणून घ्या.

 1. तुमच्या मुलांना चित्रकला आणि हस्तकला यांमध्ये आवड आहे का?

2. त्यांची ही आवड चुकीची आहे असं तुम्हाला वाटतंय का?

3. या कलांमुळे मुलांचा वेळ वाया जातोय असं तुम्हाला वाटतंय का?

यातील एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून मुलांमध्ये एकाग्रता, रंग आणि अक्षरांची समज तसेच सर्जनशीलता विकसित होते.  4-5 वर्षे ते 10-12 वर्षे वयोगटातील मुले जेव्हा पर्यावरणाशी निगडीत क्राफ्ट किंवा चित्र काढतात तेव्हा त्यांची निसर्गाविषयीची समज आणि संवेदनशीलता वाढते तसेच त्यांना विचार करण्याची नवी दृष्टी मिळते, जे त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मुलांना कलेकडे प्रोत्साहन दिले पाहिजे.  कला आणि हस्तकलेतून त्यांना कोणते फायदे मिळतात आणि या सर्वांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे या ब्लॉगद्वारे समजून घेणार आहोत.

नमस्कार, मी उचिता थोरवत-संत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि 'The Craft Shala' या प्लॅटफॉर्मची निर्माती. हस्तकलांना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आणि मुलांना त्यांच्या या छंदाचे रूपांतर त्यांच्या व्यवसायात करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा माझा ध्यास आहे. 

चला तर मग सुरुवात करूया..

1. एकाग्रता वाढते: 

 मुले जेव्हा एखादे पेंटिंग किंवा चित्र बनवतात, तेव्हा त्यांच्यात त्या शैलीबद्दल आस्था निर्माण होते आणि लक्षही केंद्रित केले जाते. जर त्यांनी चित्र काढले किंवा पेपर कटिंग केले किंवा क्ले मॉडेलिंग केले तर ते त्याला इच्छित आकार देण्याची ते काळजी घेत असतात, म्हणूनच ते बनवताना पूर्ण लक्ष देतात.  योग्य आकार, योग्य रंग निवडणे, ते सर्व एकाग्रतेने करतात. अशा उपक्रमांमुळे मुलांचे लक्ष (focus) वाढते.  यामुळे त्यांना प्रत्येक काम या एकाग्रतेने करण्याची सवय लागते.


2. सर्जनशीलता वाढते: 

 क्राफ्टद्वारे क्ले मॉडेलिंग किंवा पेपर कटिंग यांसारखी कोणतीही क्रिया मुलाला करायला लावली की, नवीन प्रयोग करून ते अधिक चांगले बनवण्याची जिज्ञासा त्याच्यात निर्माण होते.  उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलाने पेंटिंग केले आणि त्याच्या आवडीनुसार रंग निवडले, तर तो रंग त्याच्या कल्पनेत आधीपासूनच असतो.  आकाशाचा रंग निळाच असावा हे आवश्यक नाही, अनेक मुलं आपल्या आवडीच्या रंगाने आकाश बनवतात.  त्यांना बरोबर शिकवण्याचा प्रयत्न न करता, मुलाचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणे, आवश्यक आहे. बाकीच्या लोकांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता त्याच्यात किती आहे हे, जाणून घेण्याचा प्रयत्न करणे, येथे महत्त्वाचे आहे.


3.नियोजनाची समज: 

 हस्तकलेच्या माध्यमातून मुलांमध्ये पूर्वनियोजनाची भावना विकसित होते, कारण हस्तकलेमध्ये, मुले प्रथम त्यांना काय बनवायचे आहे याची भूमिका बनवतात. जसे की ते कसे सुरू करावे, त्यांना कोणता आकार हवा आहे, ते कोणते रंग निवडतील. या प्रकारे मुलांमध्ये कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजनाची समज विकसित होते. कल्पनेनुसार आकार न बनवणे किंवा रंगांची निवड योग्य नसणे यासारखे चुकीचे किंव्हा बरोबर अनुभवही क्राफ्टच्या माध्यमातून मुलाला मिळतात.


 4. प्रयोग करण्याची इच्छा: 

लाल, निळा, पिवळा, हिरवा असे काही मुख्य रंग वापरून मुले पेंटिंग करतात आणि त्यांना जांभळा, गुलाबी, केशरी असे मिश्र रंग समजत नाहीत.  जेव्हा ते या रंगांच्या वापरात तरबेज होतात, तेव्हा हळूहळू इतर मिश्र रंगांबद्दलही त्यांची समज वाढते.  याशिवाय उपलब्ध रंगांपासून ते आणखी बरेच रंग बनवायला शिकतात. जसे केशरी बनवण्यासाठी लाल आणि पिवळा रंग मिसळणे, लिंबू पिवळा रंग करण्यासाठी पिवळा आणि हिरवा मिसळणे इ.  अशा प्रयोगांमुळे मुलांमधील भीतीही दूर होते.  नवनवीन प्रयोग करून काहीतरी नवीन मिळतं असं त्यांना वाटतं.  ही निर्भयता त्यांना भविष्यासाठी तयार करते आणि ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करण्यास घाबरत नाहीत.


5. अक्षर ओळख: 

मुलांना जेव्हा कलेतून मराठी,  इंग्रजी आणि हिंदीची अक्षरे बनवायला दिली जातात तेव्हा ते त्या कामात आनंदाने सहभागी होतात. हे काम त्यांना शिकवणी सारखं वाटत नाही, उलट ते याला एक खेळ मानतात. उदाहरणार्थ, एखादे अक्षर बनवून त्यावर रंग भरण्यास सांगितले तर मुले ते आनंदाने करतील.  यामुळे ते अक्षरे बनवायला शिकतील आणि त्यांना मजाही येईल. वास्तविक शिकण्याचे हे माध्यम त्यांना अधिक आकर्षित करते. त्याचप्रमाणे गणिती संख्यांची समजही वाढवता येते.


 6. निसर्गाच्या जवळ: 

 मुलांची पर्यावरणाविषयीची समज आणि सामाजिक ज्ञान कलेच्या माध्यमातूनही वाढवता येते, जसे की एखाद्या मुलाने सफरचंद, संत्र, डाळिंब, फूल, गाय, सूर्य, चंद्र, पृथ्वी असे चित्र काढले तर त्याला या सर्व गोष्टींची माहिती होऊ लागते.  दुसरीकडे हस्तकलेच्या सहाय्याने कागद कापून चंद्र-सूर्य तयार करणे, तसेच मातीच्या साहाय्याने हत्ती, विमान, ट्रेन किंवा बस असे आकार तयार केले, तर त्याचे ज्ञान नैसर्गिक आणि सामाजिकदृष्ट्या वाढते. विविध पानांचे, भेंडी चे ठसे काढताना त्यांची क्रिएटिव्हिटी अधिक वाढते. आपण वापरत असलेली वाहने कोणती आणि निसर्गाने आपल्याला काय दिले आहे हे त्याला समजू लागते.  अशा प्रकारे मुलांना बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता या दोन्हींची चांगली जाणीव होते.

               या ब्लॉग च्या माध्यमातून आपण शिकलो की, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून मुलांमध्ये एकाग्रता, रंग आणि अक्षरांची समज तसेच सर्जनशीलता विकसित होते व अजूनही बरेच फायदे होतात. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मुलांना चित्रकला,  हस्तकला करू द्यायला हवी.

        मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व  comment जरूर करा आणि share करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं  आयुष्य ही बदलू शकतं. 

         तुमचे काही प्रश्न असतील तर ते ही तुम्हीं आम्हाला विचारू शकता. अशाच प्रकारचे ब्लॉग वाचण्यासाठी व मुलांना करता येतील असे क्राफ्ट चे व्हिडिओ बनवण्यासाठी आजच आमची द क्राफ्ट शाला ही कम्युनिटी जॉईन करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चला हस्तकला समजून घेऊया - भाग ४

चला हस्तकला समजून घेऊया - भाग १